औरंगाबाद- एम.जी.एम. वैद्यकीय महाविद्यालयात फिजीओथेरपीचे शिक्षण घेणार्या आकांक्षा देशमुख या विद्यार्थिनीच्या खून प्रकरणाचा गुंता अद्यापही कायम असून, या प्रकरणातील आरोपीचा पोलिसांना अद्याप सुगावा लागलेला नाही. पोलिसांनी गंगा वसतिगृहातील व परिसरातील काही सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. मात्र, त्यामध्ये आतापर्यंत काहीही संशयास्पद आढळून आलेले नाही.आज पुन्हा सिडको पोलिस आणि गुन्हे शाखेच्या पथकांनी एमजीएममध्ये तळ ठोकला आहे. वसतिगृहातील विद्यार्थी, कर्मचारी यांची दुपारपर्यंत चौकशी सुरू होती.
सोमवारी (१० डिसेंबर) २२ वर्षीय डॉ.आकांक्षा देशमुख या विद्यार्थिनीचा शहरातील
एम.जी. एम. शिक्षण संस्थेच्या वसतिगृहातील खोलीत गळा दाबून हत्या करण्यात आली
होती. या घटनेला चार दिवस उलटले आहेत. मारेकर्याच्या शोधार्थ शहर पोलिसांनी
संपूर्ण शक्ती पणाला लावली आहे. सिडको पोलिस ठाण्याचे पथक, गुन्हे शाखा अशा
विविध पथकांकडून या प्रकरणाची धागेदोरे गोळा करीत आहेत. आज सकाळपासूनच पोलिस
एम.जी. एम. परिसरात तळ ठोकून आहेत. वसतिगृहातील विद्यार्थी, विद्यार्थिनी, कर्मचारी, प्राध्यापकव यांच्याशी पोलिस विचारपूस करीत आहेत. आतापर्यंत कुठल्याही
निष्कर्षापर्यंत आम्ही पोहोचलेलो नाही, अशी माहिती सिडको पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक निर्मला
परदेशी यांनी दिली. आकांक्षाच्या हत्येनंतर पोलिसांनी एमजीएम रुग्णालय
परिसर व वसतिगृहातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले होते. त्यामधील बहुतांश
कॅमेर्याचे फुटेज तपासून झाले आहे.त्या फुटेजमध्ये संशयित व्यक्ती किंवा हालचाली
दिसून आलेल्या नाहीत. याचा उलगडा करून मारेकर्याला शोधण्यासाठी पोलिसांकडून सर्व
शक्यता तपासल्या जात आहेत, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांनी
दिली.















